मनुष्य ही परमेश्वराची जगातील सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितले आहे की, मानवी जीवन दुर्लभ आहे. आपल्याला मिळालेले मानवी जीवन ईश्वरी कृपा आणि अनेक पूर्वजन्मांतील आपल्या सत्कृत्यांचा परिणाम आहे. बाल्यावस्थेत माता-पिता त्याचे योग्य प्रकारे पालनपोषण करतात. त्याला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करतात व योग्य संस्कारही देतात. त्याचे योग्य वय झाल्यानंतर त्याला शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवतात. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला तेथे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मूर्ती दगडात लपलेली असते. शिल्पकाराला ती दिसते आणि निरुपयोगी भाग दूर करून तो आपल्याला सुंदर रूप दाखवतो. याच संदर्भात ‘शिक्षण’ या शब्दाची फोड करताना एक मान्यवर वक्ते म्हणाले, मूळ शब्द ‘एज्युस’ म्हणजे बाहेर काढणे असा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जे गुण, जी पात्रता, कौशल्य असते व ते प्रकट होण्यास, त्याबद्दलची जाणीव होण्यास मदत करते ते शिक्षण. शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. राष्ट्रीय वृत्ती व राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व यांची वाढ करणे, व्यक्तींमध्ये मूल्यांक संस्कार घडवणे, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तीन्ही स्तरांतून मूल्यांच्या संस्कारांची प्रक्रिया पूर्ण होईल हे पाहात ही मूल्ये विद्यार्थ्यांनी स्वीकारावीत अशा प्रकारची परिस्थिती, वातावरण निर्माण करणे हे शिक्षणात अभिप्रेत आहे.
वाचन आणि लेखनाइतकाच शिक्षणाचा मर्यादित अर्थ नाही. सामाजिक कार्यातील अनुभवातून मिळणारे शिक्षणही खूपच मोलाचे आहे. ज्ञान ही संपत्ती खरी, पण ती वापरली तरच तिचा उपयोग. शाळेतील शिक्षकाने मुलांची मने फुलवणे, मनोरंजनातून त्यांच्यावर सुसंस्कार करणे, त्यांच्या जीवनाला चांगले वळण लावणे, तसेच मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशाची भावी पिढी घडवणे ही शिक्षकाची जबाबदारी शिक्षकी पेशातील लोकांनी जोपासायला हवी. शिक्षक जर बालक होऊ शकत नसेल, तर तो योग्य प्रकारे शिक्षण देत नाही असेच समजले पाहिजे, असे आचार्य विनोबा भावे यांचे विचार होते. जगातला सर्वांत मोठा मान सेवा आणि त्याग या दोन गोष्टींमुळेच प्राप्त होतो. शिक्षक हा शिक्षणक्षेत्रातील प्रमुख घटक असून चांगली वर्तणूक, चांगल्या सुविधा, पोषक वातावरण, समता व ममतेच्या भावनेने विद्यार्थ्यांच्या मनाचे संवर्धन करणे हे शिक्षकाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे, ज्ञान मिळवणे असा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान मिळवण्याची इच्छा निर्माण करणे हा आहे. माणसाची मनोवृत्ती बदलल्यास ज्ञानाचा उपयोग होतो. शिक्षणामुळे मनावर चांगले संस्कार घडतात आणि मनुष्य सुसंस्कृत होतो. समाजात माणुसकीने कसे वागावे याचे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. आपण जे ज्ञानग्रहण करतो, ते आपल्याला बोलता, लिहिता व वाचता आणि इतरांना पटवता आले पाहिजे. विद्या म्हणजे साचलेल्या पाण्याचे डबके नव्हे, तर सतत वाहणारी भागिरथी आहे. मानवी जीवनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, म्हणून चांगली पुस्तके सतत वाचणे आवश्यक आहे. शरीराच्या पंचेंद्रियांचा म्हणजे हात, पाय, डोळे, कान, नाक आदी इंद्रियांचा योग्य उपयोग करून शिक्षणाला वळण दिले की बुद्धीचा खराखुरा विकास होत असतो. मन, बुद्धी आणि शरीर या तीन्ही गोष्टींवर संस्कार करावे लागतात. मनाला संयमाचे, बुद्धीला विवेकाचे आणि शरीराला नियमांचे संस्कार करावे लागतात.
वाचनाने माणसाच्या विचारांना प्रगल्भता येते, म्हणून वाचन ही ज्ञानसाधना आहे. या ज्ञानगंगेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. प्रत्येकाने जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. ज्ञानी व्यक्तीपाशी नैतिकतेचा अभाव असेल तर ती समाजाला आणि स्वतःलाही उपयोगी ठरणार नाही. म्हणूनच मूल्यांवर आधारीत जीवन उभारणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चांगल्या संस्कारासाठी चांगली पुस्तके वाचणे आवश्यक आहे. शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास अध्ययनाच्या किमान पातळीपर्यंत आणणे, अध्ययन सचेतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, ही भूमिका आज शिक्षकाला पार पाडायची आहे. मुलांना शिक्षण देण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे. त्यांना चांगल्या सवयी लावणे, अनुकूल वातावरण निर्माण करणे व प्रतिकूल गोष्टी दूर करणे. शैक्षणिक विकासात समाजाच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. जास्तीत जास्त समाजाला शिक्षण कसे देता येईल याचा शिक्षकांनी आणि पालकांनी विचार करावा. त्यासाठी पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

